मध्य प्रदेशात काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील; दिग्विजय सिंहांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:41 PM2019-05-20T14:41:55+5:302019-05-20T14:43:37+5:30
देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसला मध्य प्रदेशात चांगल्या जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसला १४-१७ जागा मिळतील असंही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच प्री आणि पोस्ट सर्व्हेवर आपल्याला विश्वास नसून जनतेच्या मतांवर विश्वास आहे. २३ मे रोजी मतपेट्या उघडल्या की, चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितले. यावेळी दिग्विजय सिंह यांनी मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भाजपची भोपाळमधील उमेदवार प्रज्ञा ठाकूरविरुद्ध आपण विजयी होऊ असंही सांगितले.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, देशात मोदी लाट नसून त्सुनामी आहे. मोदी देशातील मना-मनात बसलेले आहेत. त्यांनी देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. त्यामुळे जनतेने त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे देखील चौहान म्हणाले. तसेच भाजपला देशात ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज देखील चौहान यांनी व्यक्त केला.