पाटणा, दि. 3 - गुजरातनंतर आता बिहारमध्येही काँग्रेस पार्टीला जोर का झटका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपले आमदार फुटू नये, यासाठी तारेवरची कसरत करत आहे तर दुसरीकडे बिहारमध्येही पार्टीतील काही आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेसचे 27 आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता काँग्रेसचे 9 आमदार जेडीयू-भाजपाच्या संपर्कात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे काही नेते बिहारमधील भाजपातील बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही असे आमदार असे आहेत की जे बिहारमधील जेडीयू -भाजपाचं सरकार स्थापन झाल्यापासूनच जेडीयूच्या संपर्कात आहेत.
दरम्यान, गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जबरजस्त दणका बसला आहे. पार्टीतील वरिष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी पक्षाची साथ सोडली आहे. याशिवाय, काँग्रेसच्या 6 आमदारांनाही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. यातील कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी ( 2 ऑगस्ट ) छापे घातले. या छाप्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, आमच्या आमदारांवर दबाव आणण्यासाठीच छापे घालण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 44 आमदारांना बंगळुरूला हलवलंगुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलविले आहे. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.
दरम्यान यासंदर्भात भाजपातील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, ''राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसचा दिवसेंदिवस स्तर खालावत आहे. यामुळे बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. बिहारमधील काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासोबतही नितीश यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे यामुळे काही आमदार जेडीयूच्या संपर्कात आहेत आणि काहींनी आमच्यासोबत संपर्क साधला आहे''.