Congress Kantilal Bhuria : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधाकांकडून मोठ्या प्रमाणात आश्वासनं देण्यात येत आहेत. याच आश्वासनांवरुन एकमेकांवर टीका देखील केली जातेय. अशातच आता काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या आश्वासनाची देशभरात चर्चा सुरुय. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्यारतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी गुरुवारी एका प्रचारसभेत केलेल्या घोषणेमुळे नवा वाद निर्माण झालाय. माझी केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाने वातावरण तापलं आहे. भाजपसह मित्रपक्षांनीही भूरिया आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
गुरुवारी एका सभेला संबोधित करताना कांतीलाल भूरिया यांनी जनतेला अजब आश्वासन दिले. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात ‘महालक्ष्मी योजने’ची घोषणा केली. या घोषणेत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅस, बस प्रवासासाठी सबसिडी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यात एक लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेचा उल्लेख करत कांतीलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यांना दोन बायका आहेत त्यांना दोन लाख रुपये मिळतील, अशी घोषणा भुरिया यांनी केली.
"१३ मे रोजी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि प्रत्येक माता भगिनींना पुढे या. आमचा जाहीरनामा असा आहे की प्रत्येक महिलेच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील. घरातील सर्व महिलांना प्रत्येकी एक लाख मिळणार आहेत. तुम्हाला याची माहिती आहे की नाही. ज्यांना दोन बायका आहेत त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत," असे म्हणत भूरिया हसू लागले. यावेळी व्यासपीठावर दिग्विजय सिंह आणि जितू पटवारीही उपस्थित होते.
तसेच पटवारी यांनीही भुरियांचे समर्थन करताना म्हटलं की, "भूरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे. दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे. महालक्ष्मी योजनेनुसार काँग्रेसने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख महिलांना दर महिन्याला ८,५०० रुपये अर्थसहाय्य केलं जाईल."
दरम्यान, भाजपाने कांतीलाल भूरिया यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. खासदार आणि भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी निवडणूक आयोगाकडे भूरिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कांतीलाल भूरिया यांच्या विरोधात खासदार वनमंत्री नागर सिंह चौहान यांच्या पत्नी अनिता चौहान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रतलाममध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.