National Herald Case: नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दहा दिवसांनी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात काँग्रेस देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर आंदोलन करणार आहे. बुधवारी देशातील विविध ईडीच्या कार्यालयांबाहेर काँग्रेस कार्यकर्ते या कारवाईविरोधात निषेध नोंदवणार आहे. काँग्रेसने या संदर्भात सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांना एक परिपत्रक जारी केले आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरून काँग्रेसने देशव्यापी निषेध जाहीर केला आहे. पक्षाने या संदर्भात सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांना परिपत्रक जारी करत निषेध करण्यास सांगितले आहे. ईडीने आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह इतर नेत्यांचे नाव दाखल केल्याने काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी याला राजकीयदृष्ट्या प्रेरित कारवाई म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या कारवाईविरोधात बुधवारी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे.