वेंकटेश केसरी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी अनुक्रमे बसपा-सपा आणि तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची चिन्हे नसली तरी अन्य राज्यांमधील प्रादेशिक पक्ष मात्र काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने या राज्यांत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, बिहार, झारखंड व जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. या राज्यांतील प्रबळ पक्षांनी काँग्रेसशी आघाडी करायला यापूर्वीच तयारी दाखवली आहे.
तामिळनाडूतील द्रमुक, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम, कर्नाटकात जनता दल (सेक्युलर), केरळमधील काही स्थानिक प्रादेशिक पक्ष, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल तसेच जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा व उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स यांची काँग्रेसशी आघाडी झाल्यात जमा आहे. केवळ त्यांच्यात जागावाटपाची बोलणी होणे शिल्लक आहे. मात्र त्यात अडचणी येणार नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडीतील पक्षांच्या साथीने किमान ४00 जागा लढवण्याचा काँग्रेसचा मानस आहे.