- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकेक जागेसाठी ‘करा किंवा मरा’ असे धोरण राबविणार आहे. पक्षाचे निवडणूक धोरणकर्ते प्रशांत किशोर हे प्रियंका गांधी यांना जर प्रचार मोहिमेत सक्रिय केले तर त्याचा पक्षावर काय परिणाम होईल हे बघण्यासाठी सर्व्हे करीत आहेत. पाहणीचे निष्कर्ष हाती आल्यानंतरच प्रियंका गांधी यांना अमेठी व रायबरेलीच्या बाहेर प्रचारासाठी सक्रिय करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यशस्वी केलेल्या किसान यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेस संदेश यात्राही सुरू करणार आहे. प्रियंका गांधी यांना प्रचारात सक्रिय करण्याची शिफारस अगदी सुरवातीपासून प्रशांत किशोर यांनी केलेली आहे. त्यासाठी प्रियंका यांनीही तयारी दाखविली होती. परंतु पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी प्रियंका गांधी हुकमाचा एक्का असल्यामुळे खूपच विचारपूर्वक त्याचा वापर झाला पाहिजे, असा युक्तिवाद केला. वरिष्ठ नेत्यांच्या या युक्तिवादाला नाउत्तर देण्यासाठी व भविष्यात कोणी आपल्याकडे बोट दाखवू नये म्हणून किशोर यांनी सर्व्हेक्षणाचा निर्णय घेतला पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत निवडणुकांची चिन्हे आहेत. प्रशांत किशोर नोव्हेंबरच्या आधीच सर्व्हेचा निष्कर्ष सादर करतील हे स्प्ष्ट आहे. सर्व्हेक्षण अतिशय गुप्त राखले जात आहे. ते तसेच राहावे यासाठी किशोर यांची टीम त्यावर नजर ठेवून आहे. लोकांची मतो जाणून घेण्याचे काम याच टीमकडे सोपविले गेले आहे. ही टीम सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या मनातील स्पंदने टिपत आहे. प्रशांत किशोर यांचा संच गावापासून ते शहरांपर्यंत आपले काम पूर्ण करण्यात सध्या मग्न आहे.... तर थेट लाभ!निवडणुकांचे धोरणकर्ते, असे सांगतात की राहुल पंजाबमध्ये असतील तर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात प्रचाराची आघाडी सांभाळतील. अर्थात या गोष्टी सर्व्हेक्षणात पक्षाला अपेक्षित निकाल हाती लागले तरच घडणार आहेत. सुरवातीच्या संकेतांनुसार प्रियंका गांधी या प्रचारात सक्रिय झाल्या तर उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल बदलू शकतात व त्याचा थेट लाभ पक्षाला मिळू शकतो.