उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 07:31 PM2019-02-11T19:31:35+5:302019-02-11T19:34:55+5:30
लखनऊमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधींचा रोड शो
लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीउत्तर प्रदेशकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेला उत्तर प्रदेश सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतो. दिल्लीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जात असल्यानं राहुल यांनी या राज्याची जबाबदारी बहिण प्रियंका आणि तरुण खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवली. यानंतर आज काँग्रेसनं लखनऊमध्ये मोठा रोड शो केला. यामध्ये राहुल गांधींसहप्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यासाठी आधी उत्तर प्रदेश काबीज करा, असा स्पष्ट संदेश प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना राहुल यांनी दिला. याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या.
काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी लखनऊमधील रोड शोनंतर पक्ष कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत करण्याचं काम प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी झालीच पाहिजे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करणं आमचं लक्ष्य आहे. या जबाबदारीपासून एक इंचदेखील मागे हटू नका. प्रियंका, सिंधिया यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक ध्येय समोर ठेवावं,' असं राहुल म्हणाले. काँग्रेस सर्व राज्यात, संपूर्ण देशात बॅकफूटवर नव्हे, तर फ्रंटफूटवर असेल, असंदेखील राहुल यांनी म्हटलं.
आम्ही सर्व आव्हानांना निर्भिडपणे सामोरे जाऊ. कारण ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस आहे. प्रेम, बंधूभाव ही आमची विचारधारा आहे. देशाला जोडण्यासाठी आम्ही काम करतो. तर दुसऱ्या बाजूला भाजपा-आरएसएस आणि नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. देश तोडायचा, द्वेष निर्माण करायचा, देशाला कमकुवत करायचं हाच त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींनी पाच वर्षात काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशातला तरुण म्हणतोय, चौकीदार चोर है. चौकीदारानं एकालाही रोजगार दिला नाही. दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ, असं मोदी म्हणाले होते. मात्र त्यांनी राफेल डीलमधून अनिल अंबानींना लाभ मिळवून दिला. पंधरा उद्योगपतींचं साडे तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही, असं राहुल म्हणाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिल्या.