हरिष गुप्ता -
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासाठी काँग्रेसची दारे पुन्हा खुले करण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे. हा निर्णय पक्षाला नव्याने उभारी देण्याच्या दृष्टीने अनुकूल असला तरी या सर्व सल्लामसलीच्या प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याबद्दल असंतुष्ट नेते नाराज आहेत.
काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच्या प्रशांत किशोर यांच्या कृती योजनेवर चर्चा करण्यासाठी आणि पक्षात त्यांची भूमिका काय असावी, हे सूचित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नऊ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. गुलाम नबी आझाद, भूपिंदर सिंह हुड्टा, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणाचाही सध्या चालू असलेल्या चर्चेत सहभाग नाही. तथापि, गेल्या दोन-चार दिवसांपासून १० जनपथ येथे नियमितपणे बैठका घेऊन पक्षाच्या संस्कृतीशी सुसंगत प्रशांत किशोर यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत अभिप्राय देणाऱ्या समितीत मुकूल वासनिक यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मुकूल वासनिक हे आता असंतुष्ट नेत्यांच्या गटात सक्रिय नसल्याने ते असंतुष्टांच्या बैठकांनाही उपस्थित राहत नाहीत. त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता आहे. असंतुष्टापैकी एक असलेले नेते एम. वीरप्पा मोईली यांनी असे मत व्यक्त केले की, प्रशांत किशोर यांना पक्षात सामील करून घ्यावे. तथापि, गुलाम नबी आझाद हे मात्र अनुकूल नसल्याचे समजते.
भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला काही कल्पना नाही, मी समितीचा सदस्यही नाही. हरियाणात पक्ष मजबूत करण्यात मी खूप व्यस्त आहे.
नऊ सदस्यीय समितीची झाली बैठकदरम्यान, बुधवारीही नऊ सदस्यीय समितीची पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. राहुल गांधी, पी. चिदम्बरम, अंबिका सोनी, प्रियांका गांधी, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, मुकूल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला यांचा या समितीत समावेश आहे.