काँग्रेसची केंद्रात सत्ता आल्यास तिन्ही कृषी विधेयके रद्द करणार- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:40 AM2020-10-05T05:40:28+5:302020-10-05T06:49:57+5:30
Rahul Gandhi on farm bills: पंजाबमध्ये काँग्रेसच्या शेतीबचाव यात्रेला सुरुवात
मोगा : तीन कृषीविषयक कायद्यांद्वारे मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन आणि त्यांच्या जेवणाचा घासच काढू पाहत आहे. पण, आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. काँग्रेस सत्तेत येताच हे तिन्ही शेतकरीविरोधी कायदे कचºयाच्या डब्यात फेकण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केली.
राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांना संपविण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न किमान आधारभूत किंमत, अन्नधान्य खरेदी, घाऊक व्यापारी हे देशाचे तीन स्तंभ असून तेच उद््ध्वस्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.
केंद्र सरकारने तीन कृषीविषयक विधेयके संमत करून आता त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या तीन कृषी कायद्यांसंदर्भात काँग्रेसची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या पक्षाने पंजाबमध्ये तीन दिवसांच्या शेती बचाओ यात्रेचे आयोजन केले आहे.
या यात्रेचा प्रारंभ राहुल गांधी यांनी मोगा जिल्ह्यातील बधनी कलान येथे रविवारी जाहीर सभा घेऊन केला. त्यात राहुल गांधी म्हणाले की, संसदेत मंजूर झालेले तीन कृषीविषयक कायदे शेतकºयांच्या कल्याणासाठी आहेत, असे मोदी सरकार सांगत आहे. असे जर असेल तर शेतकरी या कायद्यांविरोधात निदर्शने का करत आहेत, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कृषीविषयक तीन कायदे तातडीने मंजूर करून त्यांची अंमलबजावणी केली. मोदी सरकार इतकी घाईगर्दी का करत आहे, याचे उत्तर त्याने द्यावे. या कायद्याच्या विधेयकांवर लोकसभा, राज्यसभेत सविस्तर चर्चा का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांसोबत बसले ट्रॅक्टरवर
काँग्रेसतर्फे पंजाबमध्ये काढण्यात येणाºया तीनदिवसीय शेतीबचाव यात्रेमध्ये शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसहित सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी रविवारी एका ट्रॅक्टरवर बसून शेतीबचाव यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेत ट्रॅक्टरची संख्याही मोठी आहे.