लखनौ : काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी सहारणपूर येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केले. ही शेतकरी पंचायत काँग्रेसने आयोजित केली होती. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोदी सरकार अपमान करीत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकार काम करीत आहे, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला. हे तिन्ही कायदे राक्षसी असून, ते ताबडतोब रद्द होणे आवश्यक आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष सतत लढत राहील. काँग्रेस सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने लढत राहिला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मेळावे आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यातील हा पहिला मेळावा होता. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागावर जोर देण्याचे ठरविले आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याची ही तयारी आहे. प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी आहे.सहारणपूर जिल्ह्यातील चिलकाना येथे बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किसान महापंचायतला उपस्थित होत्या. (इन्सेटमध्ये) राजस्थानमधील काँग्रेसच्या विधानसभा सदस्य इंदिरा मीना या बुधवारी जयपूरमध्ये विधानसभेत लक्षवेधीरीत्या पोहोचल्या. मीना या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ट्रॅक्टरवर आल्या होत्या.शेतकऱ्यांचे आंदोलन जमीन, देश आणि मुलांसाठी...प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘शेतकरी आंदोलन करीत आहेत, ते स्वत:चे जीवन, जमीन, देश आणि मुलांसाठी. जी व्यक्ती त्यांची थट्टा करते, त्यांना दहशतवादी व देशद्रोही ठरवले. ती कधीही देशभक्त असत नाही की, असणारही नाही. सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही साखर कारखान्यांकडून त्यांना पैसे मिळालेले नाहीत.’
"काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:34 AM