मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेसच रोखेल, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 06:15 AM2018-03-19T06:15:31+5:302018-03-19T06:15:31+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला. मोदी हे आडनाव आता भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहे, असा थेट आरोप करून, आक्रमक राहुल गांधी यांनी मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेस नक्कीच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला.
हजारो वर्षांनी महाभारताच्या युद्धासारखी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. एकीकडे संघ व भाजपाची कुटिल कौरवसेना आणि दुसरीकडे पांडवांच्या रूपाने काँग्रेस उभी आहे. कौरव असत्याची कास धरून सत्तेसाठी लढत आहेत, तर काँग्रेस पांडवांप्रमाणे सत्याच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे भीती न बाळगता, या कौरवसेनेच्या विरोधात निर्धाराने उभे राहावे, अशी आश्वासक हाक त्यांनी काँग्रेसजनांना दिली. अलीकडच्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या पराभवाने दुणावलेला विश्वास राहुल गांधींच्या तासाभराच्या भाषणात ठासून भरलेला होता.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, याची कबुली देऊन राहुल म्हणाले की, आम्ही माणूस आहोत. आमच्याकडून चुका होतात. त्या आम्ही कबूलही करतो, परंतु पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजत असल्याने, ते चुका करूनही काही झाले तरी त्या कबूल करत नाहीत.
>भाजपा सत्ताधुंद पक्ष - राहुल गांधी
मोदींनी तोंडभरून
आश्वासने दिली, पण
ती पूर्ण केली नाहीत.
मोदी ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करतात, पण बाजारपेठा चीनी उत्पादनांनी भरलेल्या आहेत.
भाजपा व संघ कौरवांप्रमाणे केवळ सत्तेसाठी लढतात.
भाजपावाले मुसलमानांना म्हणतात की, तुम्ही या देशातले नाही, तामिळींना म्हणतात की, तुमची भाषा बदला, ईशान्य भारतातील राज्यांतले लोक जे खातात, ते यांना पसंत नसते.
भाजपा हा एका संघटनेचा आवाज, तर काँग्रेस हा या देशातील जनतेचा आवाज
काँग्रेस पक्ष जनतेचा सेवक आहे. बँकांत कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्यांना भाजपा वाचवित आहे.
देशातील युवकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मोदींनी त्या विश्वासाला तडा दिला.
काँग्रेस हा सत्यासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे, कोणीही बळजबरीने आम्हाला गप्प बसवू शकणार नाही.
इतर कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेसच देशाची अधिक प्रगती करू शकतो, हा जनतेला विश्वास आहे.
राजकारणात चुका या होतातच, पण त्यातून शिकायलाही मिळते.