राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक पूर्ण, रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:54 PM2019-01-31T13:54:35+5:302019-01-31T13:56:45+5:30
राजस्थान विधानसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पण बहुमतापासून दूर राहिलेल्या काँग्रेसने अखेर आज बहुमताचा आकडा गाठला आहे.
रामगड (राजस्थान) - राजस्थान विधानसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पण बहुमतापासून दूर राहिलेल्या काँग्रेसने अखेर आज बहुमताचा आकडा गाठला आहे. आज लागलेल्या रामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या शफिया जुबेर यांनी भाजपाच्या सुखवंत सिंह यांच्यावर 12 हजार 228 मतांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच 200 सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे शतकही पूर्ण झाले आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी येथील बसपा उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने येथील निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली होती. दरम्यान, राजस्थानमधील निकालांमध्ये पक्षाला एक जागा कमी मिळाल्याने रामगडची पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार शाफिया जुबेर यांना 83 हजार 311 मते मिळवून विजयी झाल्या, तर भाजपा उमेदवार सुखवंत सिंह यांना 71 हजार 83 मते मिळाली.
Rajasthan: Congress party's Shafia Zubair after winning #RamgarhByPoll. She says "People know that we believe in working". She won with a margin of 12228 votes, garnering a total of 83311 votes. pic.twitter.com/lOf6XOVRZ5
— ANI (@ANI) January 31, 2019
ही पोटनिवडणूक राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात होती. आता या विजयामुळे त्यांचे राज्य सरकारमधील स्थान अधिक भक्कम झाले आहे. ''जनतेने समजुतदारपणे मतदान केल्याने मी आनंदी आहे. त्यांनी योग्यच निर्णय घेतला आहे. मी त्यांचे आभार मानतो. या निकालांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा आत्मविश्वास उंचावणार आहे.'' असे गहलोत म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही पोटनिवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात होती. गेल्यावेळी राजस्थानमध्ये भाजपाने पैकीच्या पैकी जागा जिंकल्या होत्या. मात्र आता या निकालामुळे राज्यात भाजपाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.