रायपूर - छत्तीसगडमधील १५ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथील निवडणुकांमध्ये काँग्रेसनेभाजपाचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत भाजपाविरोधात मतदारांचा रोष एवढा दिसून आला की, भोपालपट्टणम नगरपंचायतीमध्ये भोपळाही फोडता आला नाही. तर कोंटा येथे भाजपाला केवळ एक जागा मिळाली. दरम्यान, या पराभवानंतर भाजपाने काँग्रेसकडून पैसा आणि बळाचा वापर करण्यात आल्याचा तसेच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान खैराडग नगरपालिकेमध्ये मतदारांनी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. येथे काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी १० जागा मिळाल्या. तर बीरगावं येथे काँग्रेसला १९, भाजपाला १०, जोगी काँग्रेसला ५ आणि इतरांना ६ जागा मिळाल्या. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्या ठिकाणी बहुमत नसेल तिथे अपक्षांशी चर्चा केली जाईल. पक्षाचे प्रभारी याबाबत निर्णय घेतील असे सांगितले.
या निवडणुकांमध्ये काँग्रेसने केलेल्या चोख व्यवस्थापनामुळे भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व चीतपट झाले. छत्तीसगडमधील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये छत्तीसगडचे प्रभारी डी. पुरंदेश्वरी हेही उतरले होते. मात्र जनतेने काँग्रेसवरच विश्वास दर्शवला. दरम्यान विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक यांनी या निवडणुकीत धन, बल आणि शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.
या निकालांमधील उल्लेखनीय बाब म्हणजे भोपालपट्टणम नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये १५ जागांपैकी सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर भाजपाला खातेही उघडता आला नाही. एकूणन १५ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला १० ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर तीन ठिकाणी काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. एका ठिकाणी भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. तर एका ठिकाणी काँग्रेस आणि भाजपाला समसमाना जागा मिळाल्या आहेत.