तेलंगणा : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. आज मतमोजणी होत असलेल्या चौथ्या राज्यात म्हणजेच तेलंगणात मात्र भारत राष्ट्र समितीच्या सत्तेला सुरुंग लावत काँग्रेसने विजय मिळवला. आतापर्यंतच्या कलांनुसार, तेलंगणाच्या विधानसभेच्या एकूण ११९ जागांपैकी ६५ जागांवर काँग्रेस आघाडीवर असून भारत राष्ट्र समितीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. या राज्यात भाजप सध्या ९ जागांवर आघाडीवर असून एमआयएमचा उमेदवार पाच, तर सीपीआयचा उमेदवार एका जागेवर पुढे आहे. इतर तीन राज्यांप्रमाणे भाजपला तेलंगणात सत्ता खेचून आणण्यात यश मिळवता आलं नसलं तरीही या राज्यातूनही भाजपसाठी खूशखबर आली आहे. कारण मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा आणि मतांची आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तेलंगणात २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सात टक्के मते मिळवत भाजपला केवळ एका जागेवरच यश मिळवता आलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सध्या नऊ जागांवर आघाडीवर असून पक्षाने १३ टक्क्यांहून अधिक मते मिळवली आहेत. तसंच असदुद्दीन ओवैसी यांचा गड समजल्या जाणाऱ्या हैदराबाद शहरातही भाजप उमेदवारांनी चांगली मते घेतली आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिलासा
आगामी लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. अशा स्थितीत देशातील एक-एक राज्य महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तेलंगणात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याने भाजपसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. तसंच लोकसभा निवडणुका थेट पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावरच लढवल्या जाणार असल्याने त्या निवडणुकीत या मतांच्या टक्केवारीत आणखी वाढ होण्याचा भाजपला विश्वास आहे.
दरम्यान, भाजपने तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मागासवर्गीय जातींना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. तसंच आम्ही सत्तेत आल्यास बेकायदेशीरपणे देण्यात आलेलं मुस्लीम आरक्षण रद्द करू, असाही दावा केला होता. या आश्वासनांचा भाजपला तेलंगणात काही प्रमाणात फायदा झाला असल्याचं त्यांच्या वाढलेल्या मतदान टक्केवारीतून दिसून येत आहे.