चेन्नई - महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताच, त्यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली. तर, आता तमिळनाडूतही महिला नेत्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या आमदार एस. विजयधरणी यांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. सगल तीनवेळा आमदार राहिलेल्या विजयधरणी यांनी तमिळनाडू विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला. त्यानंतर, राजधानी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
विजयधरणी यांनी भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री एल. मुरगन आणि भाजपाचे सचिव अरविंद मेनन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विजयधरणी ह्या प्रसिद्ध तमिळ कवि दिवंगत कविमणि देसिगा विनयागम पिल्लई यांच्या कुटुंबातून आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कौतुक केला, तसेच, यापैकी काही योजना तमिळनाडूत लागू झाल्या नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महिला वर्गावर भाजपाने विशेष लक्ष दिले आहे. विजयधरणी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राजीनाम्याचे पत्रही शेअर केले आहे.
मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा देत असल्याचं विजयधरणी यांनी म्हटलं. विल्वनकोड मतदारंघातील आमदार विजयधरणी पक्षात नाराज होत्या. कारण, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांच्या नावाचा विचार केला नाही. याशिवाय, विधानसभेतील पक्षाच्या नेतेपदासाठीही त्यांचे नाव पुढे आले नाही. काँग्रेसने नुकतेच आमदार के. सेल्वापेरुंथागई यांना तमिळनाडू काँग्रेस समितीच्या प्रमुखपदी नियुक्त केलं आहे. त्यामुळे, त्या नाराज होत्या, अशी चर्चा आहे.
काँग्रेसमध्ये महिला नेत्यांच्या नेतृत्त्वाला महत्त्वाची जबाबादारी दिली जात नाही. आताही जे माझ्यापेक्षा पक्षात ज्युनिअर आहेत, त्यांना विधानसभेतील पक्षाचे नेते बनवण्यात आलं आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वार टीका केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता मी कन्याकुमारीच्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करणार आहे. विधयधरणी यांच्या भाजपा प्रवेशाने दक्षिण भारतात भाजपाची ताकद वाढली आहे. दरम्यान, नुकतेच अन्नाद्रमुक पक्षाने भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपाला फटका बसला आहे. भाजपा २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत तमिलनाडूतील ३९ लोकसभा जागांपैकी एक ही जागा जिंकू शकली नाही. त्यामुळे, आता २०२४ साठी भाजपाने तयारी केल्याचं दिसून येत आहे.