हरयाणामधील रोहतक जिल्ह्यातील सापडला परिसरात सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हा मृतदेह काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, तिचं नाव हिमानी नरवाल असल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसच्या महिला नेत्याचा मृतदेह सापडल्याचं समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हिमानी नरवाल ही काँग्रेसच्या या भागातील चर्चित युवा नेत्यांपैकी एक होती. तसेच ती पक्षाच्या अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असे. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्येही ती सहभागी झाली होती. तसेच पक्षाच्या इतर कार्यक्रमांनाही ती उपस्थित असायची. पक्षाच्या प्रचारमोहिमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग असायचा. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हिमानी नरवाल ही मुंबईमध्येही गेली होती.
हिमानी नरवालबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तिच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून, तिची आई दिल्लीला राहते. तर हिमानी ही रोहतकमधील विजयनगरमध्ये एका भाड्याच्या घरात राहायची. दरम्याना, आता हिमानी हिच्या हत्येमागे नेमकं कोणतं कारण होतं आणि या हत्येमध्ये कुणाचा सहभाग होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. हिमानी हिचा सक्रिय राजकारणातील सहभाग आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असलेल्या जवळीकीमुळे तिच्या हत्याकांडामागे काही तरी कटकारस्थान असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.