लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी माजी आयपीएस एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ही भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी यांनी स्कूटीवरून प्रवास केला. त्यावेळी राजस्थानमधील काँग्रेसचे माजी आमदार धीरज गुर्जर स्कूटी चालवत होते. मात्र, या प्रवासादम्यान प्रियंका गांधी आणि धीरज गुर्जर यांनी हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी धीरज गुर्जर यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई म्हणून 6,100 रुपयांचे चलन फाडले आहे. धीरज गुर्जर राजस्थानमधील जहाजपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच, धीरज गुर्जर हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे सहप्रभारी असून प्रियंका गांधींचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे असल्याचे सांगितले जाते.
शनिवारी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅली आटोपल्यानंतर प्रियंका गांधी माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाल्या. मात्र, लखनऊ पोलिसांनी 1090 चौकात प्रियंका गांधी यांचा ताफा रोखला. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. यानंतर पोलिसांनी माघार घेत प्रियंका गांधी यांना एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास परवानगी दिली. मात्र, प्रियंका गांधी या आपल्या ताफ्यातून न जाता स्कूटीवरुन एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचल्या.
पोलिसाने माझा गळा दाबला - प्रियांका गांधीनागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी आयपीएस एस. आर. दारापुरी यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेशातील एका महिला पोलिसाने आपला गळा दाबला, तसेच आपणास धक्का देऊन खाली पाडले, असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला. प्रियांका गांधी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांना विनाकारण अटक केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी जात होते. काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून मी बाहेर पडले. लोहिया चौकात आम्हाला पोलिसांनी अडवले. मी गाडीतून उतरून पायी चालू लागले, तेव्हा मला पोलिसांनी घेरले. एका महिला पोलिसाने माझा गळा दाबला. मला धक्का दिला. त्यामुळे मी पडले. पुढे गेल्यानंतर मला पुन्हा पकडण्यात आले. मी एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून जाऊ लागले, तेव्हा त्यालाही पाडण्यात आले.