Jammu Kashmir and Haryana Election Results: हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येऊ लागला आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे ट्रेंडही येऊ लागले आहेत. मात्र मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेस पक्षाने विजयाचा जल्लोष सुरू केला. सुरुवातीच्या कलानुसार हरयाणामध्येकाँग्रेस आघाडीवर होती. त्यानंतर दिल्लीत काँग्रेसकडून जोरदार जल्लोष सुरु झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी मिठाई वाटण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना मिठाई पाठवणार असल्याचे म्हटलं आहे.
निकालाचे कल हाती आल्यानंतर काँग्रेसने दोन्ही राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. १० वर्षांनी हरयाणात पुन्हा सत्तेत येईल असा पक्षाचा दावा आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून सरकार स्थापन करणार असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे. दरम्यान, नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात जिलेबी वाटप सुरू झाले आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेरील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात असून, कल येताच त्यांनी जिलेबीचे वाटप सुरू केले आहे. यावेळी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिली.
'जरा थांबा, आमचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी मेहनत घेतली. आम्हाला विश्वास आहे की आज दिवसभर लाडू आणि जिलेबी खायला मिळतील. पंतप्रधान मोदींनाही जलेबी पाठवणार आहोत. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू, असा आम्हाला विश्वास आहे, असे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, नवी दिल्लीतील भाजप कार्यालयातही उत्साहाचे वातावरण आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेवण तयार केले जात आहे.
हरयाणात निकालाचे चित्र बदललं; भाजप पुढे
हरयाणाच्या सुरुवातीच्या कलामध्ये मागे पडलेला भारतीय जनता पक्ष आता शर्यतीत परताना दिसत आहे. निवडणूक आयोगाने ६० जागांचे कल जाहीर केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष ३० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २८ जागांवर पुढे आहे. इंडियन नॅशनल लोकदल एका जागेवर आघाडीवर आहे