नवी दिल्ली - माजी राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याच दरम्यान कार्यकर्त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात मंगळवारी जम्मूत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संतप्त झालेल्या लोकांनी गुलाम नबी आझाद यांचा पुतळा देखील जाळला आहे. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जम्मूत रस्त्यावर उतरले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आझाद पक्षाविरुद्ध कारवाया करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली आणि त्यासोबतच गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळला. जम्मूमध्ये एका सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं होतं. आझाद यांनी मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आवडतात. मी स्वतः एका खेड्यातून आलो आहे. मला याचा अभिमान वाटतो. आपले पंतप्रधानही सांगतात, की ते ही एका गावातूनच आले आहेत. काहीच नव्हते, भांडी घासत होते, चहा विकत होते. ते म्हणाले, आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, किमान जे आपले वास्तव आहे, ते लपवत नाहीत. जे लोक आपले वास्तव लपवतात. ते खोट्या विश्वात राहतात. व्यक्तीला अभिमान असायला हवा असं म्हटलं होतं.
गुलाम नबी आझाद जम्मू येथे गुज्जर देश चॅरिटेबल ट्रस्टच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी येथे ट्रस्टचे सर्वात पहिले ट्रस्टी मसूद चौधरी यांच्या नावाने सुरू केलेल्या लायब्ररीचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी गुज्जर बकरवाल समुदायाला संबोधित केले. येथे त्यांनी पंतप्रधान मोदींची खरे बोलण्यावरून प्रशंसा केली. आझाद नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निरोपाच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जबरदस्त कौतुक केले होते. यावेळी मोदी भावूकही झाले होते. यानंतर आझादांनीही पंतप्रधानांचे आभार मानत कौतुक केले होते.
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने (BJP) गड राखत निर्भेळ यश मिळविले. सहा महापालिकांच्या एकूण 567 जागांपैकी भाजपाने 490 जागा जिंकल्या. काँग्रेसला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून केवळ 48 जागा जिंकता आल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते खूप निराश झाले आहेत. त्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन केलं आहे. पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हा आणि शहर अध्यक्षांचे पुतळे जाळले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकून बाबू रायका, कादिर पीरजादा आणि तुषार चौधरी यांचे पुतळे जाळले आणि आरोप केला की या लोकांनी काँग्रेसला विकलं आहे. कार्यकर्त्यांनी या नेत्यांचे फोटो देखील फाडून टाकले आहेत. एकीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच या निवडणुकीत आपने नवा पर्याय दिला आहे.