लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:21 AM2019-02-11T11:21:48+5:302019-02-11T11:23:52+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधीं यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लखनौ - काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांनी दुर्गा अवतारामध्ये दाखवले आहे.
लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या एका पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना वाघावर स्वार झालेल्या दुर्गेच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. माँ दुर्गेचे रूप असलेल्या भगिनी प्रियंका जी यांचे स्वागत असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.
तर अन्य एका पोस्टरमध्ये युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर पांडेय यांनी एक बॅनर लावला असून, त्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे आहेत. तसेच एक गट त्यांना सोडून जात असून, हे तिघेही एकटे पडल्याचे त्यात दर्शवले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच त्या राज्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेही असतील.
या तिघांचे लखनौमध्ये भव्य स्वागत करण्याचे प्रदेश काँग्रेसने ठरविले आहे. त्यांचा रोड शोही आयोजिण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, हे तिन्ही नेते लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी सोमवारीच दिल्लीला परतण्याची शक्यता असून, प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून, त्यातील ४२ जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. त्या व ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाºयांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
Lucknow: Latest visuals from Congress office. General Secretary for Uttar Pradesh East Priyanka Gandhi Vadra, General secretary for Uttar Pradesh West Jyotiraditya Scindia and party President Rahul Gandhi are visiting the city today. pic.twitter.com/zwfUn5VJTq
— ANI UP (@ANINewsUP) February 11, 2019