नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी सायंकाळी 4 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित राहणार आहेत.
राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत कपिल सिब्बल, अखिलेश प्रसाद सिंह, मनीष तिवारी आणि इतर काही नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच, प्रियंका गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. प्रियांका गांधी यांची मेहनत उत्तर प्रदेशात का कामी आली नाही? मेहनत करूनही यश न मिळणे यावरून पक्षाच्या केंद्रीय धोरणांवरील प्रश्न आणि त्रुटी दिसून आल्याचे बैठकीत म्हटले आहे.
याआधी गुरुवारी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती दिली होती. पक्षाने निकालांचे आत्मपरीक्षण करण्यासाठी लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले होते. दरम्यान, पक्षातील बदलासाठी विशेषत: G-23 गटातील नाराज नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत.
G-23 ने सुमारे दोन वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनेत बदलासाठी पत्र लिहिले होते, त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली. उत्तर प्रदेशात काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. तर उत्तराखंडमध्ये 19, पंजाबमध्ये 18, गोव्यात 11 आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.