काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पारित झाले हे तीन प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:07 AM2019-08-11T00:07:05+5:302019-08-11T00:08:38+5:30
सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रासमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली
नवी दिल्ली - राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेला काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचा संभ्रम आज सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे संपला. दरम्यान, सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रासमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. कार्यकारिणीच्या बैठतीत या राहुल गांधी यांचे पक्षाच्या केलेल्या नेतृत्वाबाबत आभार मानण्याबरोबरच एकूण तीन प्रस्ताव पारित करण्यात आले.
कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देताना रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ''आज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण तीन प्रस्ताव पारित करण्यात आले. सुरुवातीला राहुल गांधी यांनी पक्षाच्या केलेल्या नेतृत्वाबाबत त्यांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर पक्षाच्या देशभरातील प्रदेशाध्यक्ष, खासदार आणि विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेऊन अध्यक्षपदी कायम राहावे असा प्रस्ताव पारित करण्यात आला. मात्र राहुल गांधी यांनी विनम्रपणे अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली.''
आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगिलते. ''कार्यकारिणीच्या बैठकीत काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तेथे होत असलेली राजकीय नेत्यांची धरपकड आणि वृत्तांकनावर घालण्यात आलेल्या प्रतिबंधांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सरकारने काश्मीरबाबत पारदर्शक भूमिका घेऊन विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला काश्मीरला भेट देऊ द्यावी, असा आवाहन करण्यात आले,''असे सुरजेवाला यांनी सांगितले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी अखेर सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातील कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
K C Venugopal: CWC expressed serious concerns over situation in J&K including reports of clampdown, news blackouts, arrests & detentions of Indian political leadership of J&K. CWC calls upon govt to act in transparent fashion & permit a delegation of opposition parties in J&K. https://t.co/VoducmBi7y
— ANI (@ANI) August 10, 2019