चंदीगडः हरियाणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्षांचेही प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचीही हरियाणातल्या नूंह जिल्ह्यात प्रचारसभा झाली. राहुल गांधींनी यावेळी भाजपा आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या मोदी आणि खट्टर हे फक्त खोटी आश्वासनं देत सुटले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार, शेतकरी कल्याण आणि रोजगाराची आश्वासनंही फसवी असल्याचं म्हटलं आहे.तसेच भाजपाबरोबरच त्यांनी संघावरही निशाणा साधला आहे. काँग्रेस सर्वांचा पक्ष आहे, तो जनतेला जोडायचं काम करतोय, तर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांसारखं देश तोडायचं काम करतायत. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये केलेल्या कामांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, देशात तरुणांना बेरोजगारीचा फटका बसतो आहे. मोदी एकावर एक खोटी आश्वासनं देत आहेत. मोदी दर दहाव्या दिवसाला मन की बात करतात, तर मी विचार केला मग आपण त्याऐवजी काम की बात करू, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे हरयाणामधील एका प्रचारसभेला संबोधित करताना सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. खट्टर यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत हीन दर्जाचे आणि भाजपाची महिलाविरोधी विचारसरणी दाखवणारे आहे. तसेच खट्टर यांनी आपल्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली होती. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी मनोहरलाल खट्टर यांनी सोनिया गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहेत. तसेच हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर नसून खेचर आहेत, असा टोला लगावला.