अंकिता दत्ता यांच्यावर काँग्रेसची कारवाई, 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित, IYC प्रमुख श्रीनिवास बीवी यांच्यावर केले होते गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:25 PM2023-04-22T14:25:20+5:302023-04-22T14:26:17+5:30
एक दिवस आधी काँग्रेसने याप्रकरणी अंकिता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
नवी दिल्ली : भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्यावर छळवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या आसाम युवक काँग्रेसच्या प्रमुख अंकिता दत्ता यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून अंकिता यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एक दिवस आधी काँग्रेसने याप्रकरणी अंकिता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
एपीसीसी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी गेल्या गुरुवारी अंकिता दत्ता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि स्पष्टीकरण मागितले. अंकिता दत्ता यांनी काँग्रेस नेत्यांवर छळ आणि भेदभाव केल्याचा आरोप केला होता. अंकिता दत्ता यांनी गुवाहाटी येथील दिसपूर पोलिस ठाण्यात श्रीनिवास बीवी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांतच कारणे दाखवा नोटीस आली.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मंगळवारी अंकिता दत्ता यांनी ट्विटरवर ट्विट केले की, भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी मला सतत त्रास दिला आणि माझ्यासोबत भेदभाव केला. अंकिता दत्ता यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना टॅग करत अनेक ट्विट केले होते. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "एक पुरुष वर्चस्ववादी भारतीय युवक काँग्रेसचे नेतृत्व कसे करू शकतो, जो सतत महिलांचा छळ आणि अपमान करतो. प्रियंका गांधींच्या 'लडकी हूं लड सकती हूं' याचे काय झाले?"
याशिवाय आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "माझ्या तक्रारी असूनही श्रीनिवास यांच्याविरोधात कोणतीही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली नाही. राहुल गांधी हे सुरक्षित ठिकाण आहे का? प्रियांका गांधी महिलांबद्दल बोलतात." याचबरोबर, पुढे अंकिता यांनी लिहिले की, "मी अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर कारवाईची वाट पाहत आहे. तरीही कोणी स्वारस्य दाखवले नाही. श्रीनिवास आपल्या पीआरच्या नावाखाली सर्व प्रकारच्या चुकीच्या कामांपासून आपला बचाव करत आहे."
दसरीकडे, भारतीय युवक काँग्रेसने अंकिता यांचे आरोप तथ्यहीन आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अंकिता या काँग्रेसचे माजी मंत्री अंजन दत्ता यांच्या कन्या आहेत.