काँग्रेसच्या जागा का निसटल्या?, अतिआत्मविश्वास नडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:36 AM2018-05-16T04:36:54+5:302018-05-16T04:36:54+5:30
राष्ट्रीय नेत्यांचे कमी दौरे आणि भाजपाच्या तुलनेत कमी साधनसामग्री, तसेच तुलनेने कमी पैसा ही काँग्रेसच्या कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवाची महत्त्वाची कारणे असल्याचे दिसत आहे.
बंगळुरू : राहुल गांधी यांच्या प्रचार सभा व दौऱ्यांमुळे पक्षनेत्यांचा वाढलेला अतिआत्मविश्वास, स्वयंस्फूर्तीने प्रचारात उतरणा-या कार्यकर्त्यांचा अभाव, लिंगायत मतांवर ठेवलेला अतिविश्वास, सिद्धरामय्या यांच्याखेरीज एकही प्रादेशिक नेता नसणे, राष्ट्रीय नेत्यांचे कमी दौरे आणि भाजपाच्या तुलनेत कमी साधनसामग्री, तसेच तुलनेने कमी पैसा ही काँग्रेसच्या कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवाची महत्त्वाची कारणे असल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी प्रचारात उतरल्याने आणि त्यांची प्रचारासाठी भरपूर वेळ दिल्याने आपला विजय नक्की आहे, असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले, पण झंझावाती दौरा करणारा नेता असूनही कार्यकर्त्यांची खूपच कमतरता काँग्रेसला जाणवत होती. सभा मोठ्या होत होत्या, पण प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचेण्याची यंत्रणा मात्र पक्षाकडे नव्हती. गेल्या काही वर्षांत सर्वच राज्यांत काँग्रेसला कार्यकर्त्यांचा प्रश्न भेडसावत आहे. केवळ नेते येताच पुढेपुढे करणारे कार्यकर्ते नंतर गायब होतात, असे आढळून आले आहे. कर्नाटकातही त्याहून वेगळे घडले नाही.
लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा दिल्याने, ती मते मोठ्या प्रमाणात भाजपाकडून आपल्याकडे येतील, भाजपा नेते येडियुरप्पा यांच्या व्होट बँकेला धक्का लागेल, असे स्वत: सिद्धरामय्या यांना वाटत होते. किंबहुना, त्यासाठीच त्यांनी तो निर्णय घेतला, पण त्याचा काहीच उपयोग काँग्रेसला झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच त्या मतांवर अतिविश्वास ठेवणे काँग्रेसच्या अंगाशी आले. ती मते भाजपाकडेच गेली.
सिद्धरामय्या यांच्याशिवाय राज्यभर स्थान असेल आणि सर्वत्र प्रचार करू शकेल, असा एकही बडा प्रादेशिक नेता काँग्रेसकडे नव्हता. जे काही नेते होते, ते स्वत:च्याच मतदार संघात अडकून पडले होते. सिद्धरामय्या व राहुल गांधी हे दोघेच स्टार प्रचारक होते आणि त्यांच्याही दौºयांना मर्यादा होत्या. अगदी काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे हेही संपूर्ण कर्नाटकचे नेते म्हणून ओळखले जात नाहीत. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपैकी सोनिया गांधी यांच्या एखाद-दोन सभा झाल्या आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केवळ पत्रकार परिषदच घेतली.
भाजपाने प्रथमच कर्नाटकात कधी नव्हे, इतका खर्च केला. लोकांच्या लक्षात येईल, इतका पैसा ओतला जात होता. त्या तुलनेत काँग्रेसकडे तितका पैसा व साधनसामग्री नव्हती. तिचे वाटप करायला कार्यकर्त्यांची फौज नव्हती. पोस्टर्स, प्रचार साहित्य यांचे गठ्ठेच्या गठ्ठे पडून राहिल्याचे मतदानानंतर पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत तर सोडाच, पण अनेक वस्त्यांमध्येही काँग्रेसचा प्रचार झाला नाही. यामुळे काँग्रेसला आपली गरजच नाही, असे चित्र काही भागांत निर्माण झाल्यास नवलच नाही.
याशिवाय पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाबद्दल लोकांमध्ये काहीशी नाराजी असतेच. ती येथेही होती. काही नेत्यांचा उर्मटपणा, वागण्याची पद्धत याबद्दलही राग होता. शेतकºयांच्या आत्महत्यांमुळे संताप होता. केलेल्या कामांचा पुरेसा प्रसार करण्यात सरकार व पक्ष यशस्वी झाला नव्हता. मतदारांनी दर पाच वर्षांनी सत्ताधारी पक्षाला बाहेरचा रस्ता दाखविला आहे, असा इतिहास असताना, जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेण्यात काँग्रेस कमी पडली, हेही पराभवाचे एक कारण होतेच.
>जातीपातींचे समीकरण नाही जमले
जातीपातींचे चुकीचे राजकारण केल्यानेच काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसने लिंगायतांचा मुद्दा हाती घ्यायला नको होता, असे नमूद करतानाच, विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कर्नाटकातील जातीपातींचे समीकरण नीट जुळवता आले नाही, असेही मोईली म्हणाले. मोईली हे स्वत: कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आहेत.विधानसभा निवडणुकांचे निकाल जसजसे जाहीर होऊ लागले, तसतसे काँग्रेसवर मागे पडत असल्याचे स्पष्ट होत गेले. हे निकाल खूपच निराशाजनक आहेत, असे सांगून मोईली पुढे म्हणाले की, या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नकारात्मक प्रचारावर भर दिला होता. त्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सकारात्मक प्रचाराने चोख प्रत्युत्तर दिले होते. राज्यात काँग्रेसने केलेले काम पाहता पक्षाला विजय मिळायला हवा होता, पण तसे झाले नाही. नकारात्मक प्रचारामुळेच भाजपाला यश मिळाले आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.लिंगायत व वीरशैव यांना धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारकडे केली होती. आपली मते फोडण्यासाठी काँग्रेस ही चाल खेळत आहे, असा भाजपाचा समज झाला. लिंगायत समाज नेहमीच भाजपाच्या बाजूनेच उभा राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपाने लिंगायत समाजावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि लिंगायतांबाबत निर्णय घेऊ नही काँग्रेसला ती मते मिळालीच नाहीत, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळेही पक्षाचा पराभव झाला असण्याची शक्यता आहे.
>मतांच्या टक्केवारीत काँग्रेसने मारली बाजी
जागा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत काँग्रेसने भाजपापेक्षाही अधिक आघाडी घेतली आहे. भाजपापेक्षा काँग्रेसला 1.8 टक्के अधिक मते पडली पडली आहेत.
>पक्षनिहाय
मतदान (टक्के)
काँग्रेस 38.1
भाजपा 36.2
जेडीएस 18.4
अपक्ष 4.0
बसप 0.3
इतर 1.1
नोटा 0.9