शीलेश शर्मा लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरून वाद सुरू झाला असताना, मोदी सरकारच्या आरोपांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक रणनीती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितले की, या रणनीतीनुसार, मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात तपास समिती स्थापन केली आहे. आगामी तीन दिवसांत ही समिती अहवाल देणार आहे.
गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारला पाठविण्यात येत असलेल्या उत्तरात मुख्यमंत्री चन्नी यांनी सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा दावा फेटाळला आहे. तसेच, पंजाब पोलिसांनाही त्यांनी क्लीन चिट दिली आहे. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप पंजाबमध्ये निवडणूक मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी एका चॅनलच्या रिपोर्टरला दाखवून दिले की, आंदोलक कशा प्रकारे त्यांचा ताफा अडवीत आहेत.
पंतप्रधानांचा ताफा तर एक कि.मी. मागे होता. जर पंतप्रधानांनी आंदोलकांशी चर्चा केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
गर्दी जमली नाही, तर माझा काय दोष? - चन्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी जमली नाही तर यात माझा काय दोष? असा प्रश्न पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गुरुवारी विचारला. ते म्हणाले, भाजपने सभेसाठी ७० हजार खुर्च्या लावल्या होत्या; परंतु ७०० लोकही आले नाहीत. पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, शेतकरी वर्षभर सीमेवर बसले तेव्हा कोणी काही म्हटले नाही. पंतप्रधानांना १५ मिनिटे थांबावे लागले तर त्रास झाला.