नवी दिल्ली : फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदी याला वाचविण्यासाठी काँग्रेस ‘जास्तीत जास्त प्रयत्न’ करत असल्याचा आरोप केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.मोदी याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असलेली व्यक्ती ही काँग्रेसचा सदस्य असून, उच्च न्यायालयाचा माजी न्यायमूर्ती आहे, असा आरोप प्रसाद यांनी केला. हा माजी न्यायमूर्ती नीरव मोदीविरुद्ध सुरू असलेल्या प्रत्यार्पण प्रक्रियेमध्ये आरोपीची बाजू मांडत आहे, असे ते म्हणाले. नीरव मोदी याला वाचवण्यासाठी काँग्रेस शक्य होईल तेवढे प्रयत्न करत असल्याचे सूचित होईल, अशी काही संशयास्पद परिस्थिती अस्तित्वात असल्याचे दिसत आहे, असेही प्रसाद म्हणाले.प्रसाद यांचे भाजपमधील सहकारी संबित पात्रा यांनी आरोप केला की, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे हे मोदीच्या खटल्यात साक्षीदार म्हणून सादर होत आहेत.’’ पात्रा यांनी ठिपसे यांचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचे छायाचित्र टिष्ट्वटरवर टॅग केले. पात्रा म्हणाले, इकडे भारतात राहुल गांधी हे नीरव मोदीवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधींचे जवळचे सहकारी आणि काँग्रेसचे नेते अभय ठिपसे (माजी न्यायमूर्ती) नीरव मोदीचे साक्षीदार बनले आहेत, असे काय आहे की नीरव मोदी भारतात परत येऊ नये? राहुल आणि नीरव यांच्यात त्या पार्टीमध्ये कोणता व्यवहार झाला?
नीरव मोदीला वाचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, संबित पात्रांनी घेतले माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:41 AM