अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण तापू लागले असतानाच, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याशी खा. अहमद पटेल यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.भडोचच्या सरदार पटेल हॉस्पिटल अॅण्ड हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये इको कार्डिओग्राम टेक्निशिअन असलेल्या मोहम्मद कासिम या तरुणाला नोकरी सोडल्यानंतर अटक करण्यात आली. त्याचा इसिसशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अहमद पटेल यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी विजय रूपाणी यांनी केली आहे.गुजरात एटीएसने इसिसशी संबंधित ज्या दोन जणांना बुधवारी अटक केली, त्यात कासिमचा समावेश आहे. निवडणुकांच्या काळात तसेच काही धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ले करण्याची त्यांची योजना होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कासिम व ओबैद अशी त्यांची नावे आहेत. सरदार पटेल रुग्णालयात कासिम नोकरी करीत होता आणि खा. पटेल रुग्णालयाचे विश्वस्त होते. त्यामुळे दोन्हींचा संबंध जोडण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. खा. अहमद पटेल हे आजही रुग्णालयाचे सर्वेसर्वा असल्याचे मुख्यमंत्री रूपाणी म्हणाले.मात्र अहमद पटेल यांनी २0१४ सालीच विश्वस्तपदाचा राजीनामा दिला आहे आणि आता त्यांचा रुग्णालयाशी संबंध नसल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.त्याला नोकरी देताना, त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती, असेही रुग्णालयाने म्हटले आहे. काँग्रेसनेही मुख्यमंत्री रूपाणी यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून, आपले अपयश झाकण्यासाठी भाजपा असे आरोप करीत आहे, अशी टीका केली आहे. (वृत्तसंस्था)इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून या दोघांना २५ आॅक्टोबर रोजी सुरतमधून अटक करण्यात आली होती. अहमदाबादमधील खडिया भागात असलेल्या सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थना स्थळ)ची त्यांनी पाहणी करून ठेवली होती. त्या दोघांवर जमाईकामधील अब्दुल्ला अल फैसल याचा प्रभाव होता. त्यानेच त्यांची माथी फिरवली होती, असे सांगण्यात येते. धार्मिक स्थळांवर हल्ले करून परदेशात पळून जाण्याची त्यांची योजना होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी पासपोर्टही तयार ठेवले होते.
अहमद पटेल यांच्यावर भाजपाचे गंभीर आरोप, अजिबात तथ्य नसल्याचा काँग्रेसचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 2:47 AM