- विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : काश्मीरमधील दहशतवादाची आग ही काँग्रेसने लावलेली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ही आग विझविण्याचा निष्ठेने प्रयत्न केला. आता काँग्रेसप्रणित संपुआ आघाडीने जम्मू काश्मीर आणि भारताला स्वतंत्र पंतप्रधान देण्याची भाषा केली आहे. हा प्रकार आपण मान्य कराल का? असा प्रश्न करीत देशाला दोन पंतप्रधान देण्याचा काँग्रेसचा डाव उधळून लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
नांदेड येथील कौठा असर्जन परिसरात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले, जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान देण्याची तरतूद होती, अशी भाषा करुन एनडीएमधील घटक दलाने एकप्रकारे काँग्रेसचे मनसुबे उघड केले आहे. उमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला यांनी देशाला दोन पंतप्रधान देण्याची केलेली भाषा तुम्हाला मंजूर आहे का, असा सवाल त्यांनी जनसमुदायाला केला. काँग्रेस पक्ष पाकिस्तानकडून पैसे घेवून चर्चेची भाषा करीत आहे. हे एक प्रकारचे पाप असल्याचे सांगत देशद्रोहाचा कायदा हटवून तुम्ही देशाचे तुकडे पाडणाऱ्याला लायसन देण्याचा प्रयत्न करीत आहात, अशी घणाघाती टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली. सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागणारी काँग्रेस देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे. बोफोर्सनंतर हेलिकॉप्टर खरेदीतही यांनीच दलाली केल्याचे सांगत २०१४ मध्ये या सर्व विरोधकांना मी चौकशीच्या फेऱ्यात आणले आहे. तुम्ही पुन्हा माझ्या पाठीशी राहून देशाची सत्ता द्या. या विरोधकांना त्यांची खरी जागा मी दाखवून देतो, असे सांगत विरोधकांना कोठडीत डांबण्याचा इशारा मोदी यांनी दिला.
काँग्रेस या निवडणुकीत पुन्हा संकटात सापडली आहे. संकट आले की, काँग्रेसला मध्यमवर्गीय आठवतात. मात्र काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात मध्यमवर्गीय शब्दसुद्धा नसल्याचे सांगत काँग्रेसची अवस्था गजनी सारखी झाल्याचे ते म्हणाले.२०१४ मध्ये तुम्ही विकासाच्या प्रारंभासाठी मत दिले होते. आता २०१९ मध्ये सर्वांगिण विकासाचे स्वप्न पूर्ण झालेले दिसेल. २०१४ मध्ये तुम्ही डिजीटल इंडियाच्या रुपाने कामकाजात बदल करण्यासाठी मत दिले होते. आता २०१९ चे मत मेक इन इंडियासाठी द्या. २०१४ मध्ये तुम्ही दहशतवादाला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपाला मत दिले होते. आता २०१९ चे मत दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी भाजपाला द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव आदी उपस्थित होत‘जाहीरनामा काँग्रेसचा की जैश-ए-मोहम्मदचा’भारतीय जवानावर हल्ला झाल्यास आम्ही केवळ इशारे देत नाही तर शत्रुला घुसून मारतो, याची प्रचिती भारतीयांना आली आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र जाहीरनाम्याच्या माध्यमातून देशातील देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकण्याची भाषा करीत आहे. जाहीरनाम्यातील हे वचन पाहिल्यानंतर हा जाहीरनामा काँग्रेसचा आहे की जैश-ए-मोहम्मदचा आहे, असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.