नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये द्रमुकसोबत निवडणूकपूर्व आघाडी पक्की केल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठी आता प. बंगालमध्ये माकपासोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय या डाव्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीनंतर घेण्याची शक्यता आहे. माकपच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडीच्या मुद्यावर चर्चा केल्यानंतरच काँग्रेस श्रेष्ठीतर्फे विचार केला जाईल, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.माकपा पॉलिट ब्युरोची बैठक येत्या मंगळवारी होणार आहे आणि त्यानंतर दोन दिवसांच्या आत माकपच्या केंद्रीय समितीची बैठक घेण्यात येईल. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील माकपप्रणीत डाव्या आघाडीने काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्याला सहमती दर्शविलेली होती.या महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या सोबत बैठक घेऊन तृणमूल काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला होता. तथापि, डाव्या आघाडीसोबत आघाडी करण्यावरूनही या काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले होते. या मुद्यावर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी लवकरच निर्णय घेतील, असे आश्वासन राहुल गांधी यांनी या नेत्यांना दिले होते.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी पश्चिम बंगालमधील कोणता पक्ष सहायक ठरू शकतो, याची चाचपणी केल्यानंतरच काँग्रेस पक्ष राज्यात आघाडीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी माकपने आरंभिलेल्या मोहिमेबाबत काँग्रेस पक्ष अद्याप शांत आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि माकपाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याचे आवाहन नुकतेच केलेले होते.
माकपच्या बैठकीनंतरच काँग्रेसचा निर्णय
By admin | Published: February 15, 2016 3:45 AM