नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असं विधान केले. त्याचसोबत आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा करू. त्यात राज्यातील नेते नसतील असं म्हटलं होते. मात्र त्यावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला. आता नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाबाबत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दिल्लीच्या काँग्रेस बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, महाविकास आघाडीत काँग्रेस २२, शिवसेना ठाकरे गट १८, राष्ट्रवादी शरद पवार गट ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडीला २ जागा सोडण्यात येतील. हा फॉर्म्युला काँग्रेसकडून समोर आला आहे. दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींनी आढावा घेतला. त्यात राज्यातील नेते कोणकोणत्या जागा लढवू इच्छितात, कोणत्या जागांसाठी इच्छुक आहेत यावर चर्चा झाली. या बैठकीतून काँग्रेस २२ जागांसाठी आग्रही असल्याचे दिसते. ठाकरे गटाला २३ जागा हव्या होत्या परंतु काँग्रेसची इतक्या जागा सोडण्याची तयारी नसल्याचे दिसून येते. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.
२०१९ नंतरच्या घडामोडीत अनेक पक्षांची राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेने भाजपासोबत निवडणूक लढून १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता ती स्थिती नाही. त्यात उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्ष फुटलेला आहे. या दोन्ही गटाचे चिन्ह कोणते असेल हेदेखील अद्याप निश्चित नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झुकतं माप द्यावे आणि विधानसभा तसेच प्रादेशिक निवडणुकीत उद्धव ठाकरे-शरद पवार गटाला झुकतं माप द्यावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यात काँग्रेसनं विजय मिळवत सरकार बनवलं आहे. त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यात मविआच्या जागावाटपात काँग्रेस २२ जागांसाठी आग्रही राहणार असल्याचं कळालं आहे.
दरम्यान, शरद पवार-उद्धव ठाकरे गटात मातोश्रीत बैठक झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाकडून १०-११ जागा लढण्याची तयारी आहे. त्यात शिरूर, सातारा, माढा, बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड, भिवंडी, अहमदनगर या जागांसाठी पवार गट आग्रही आहे. जानेवारीत पुन्हा ठाकरे-पवार गटात बैठक होणार आहे. एकीकडे दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आणि दुसरीकडे ठाकरे-पवार बैठक यामुळे जास्तीच्या जागा घेण्यासाठी मविआच्या सर्वच पक्षात चढाओढ लागल्याचं दिसून येते. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते आग्रही आहेत.