बंगळुरू - कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतच्या वाटाघाटी संपुष्टात आल्या असून, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. ही माहिती कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी कुमारस्वामी यांनी दिली.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार जी. परमेश्वर यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काँग्रेसचे नेते के.आर. रमेश यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर होईल खातेवाटप काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर च्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत कॅबिनेटबाबत चर्चा झाली. एकूण 34 मंत्र्यांपैकी 22 मंत्री काँग्रेसचे असतील. तर 12 मंत्र्यांसह मुख्यमंत्रिपद जनता दल सेक्युलरकडे राहील. बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप केले जाईल.