नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काल बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गौरव वल्लभ यांनी सनातनविरोधी घोषणाबाजी करू शकत नसल्याचे सांगत पक्षाचा राजीनामा दिला. दरम्यान, गौरव वल्लभ यांचा राजीनामा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आज काँग्रेस पक्ष ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, तो मला तरी योग्य वाटत नाही. मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा सकाळ-संध्याकाळ देशाच्या वेल्थ क्रिएटर्सना शिवीगाळ करू शकत नाही. या कारणास्तव मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
गौरव वल्लभ यांनी राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, मी भावनिक आणि मनाने दु:खी आहे. मला खूप काही सांगायचे आहे, लिहायचे आहे. पण माझे संस्कार मला असे काहीही बोलण्यास मनाई करतात .तरीही आज मी माझे मत तुमच्यासमोर मांडत आहे, कारण मला वाटते की सत्य लपवणे हा देखील गुन्हा आहे. अशा स्थितीत मला गुन्ह्यात सहभागी व्हायचे नाही. जेव्हा मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, तेव्हा काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असल्याचा माझा विश्वास होता. येथे तरुण आणि बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते, परंतु गेल्या काही वर्षांत माझ्या लक्षात आले आहे की, पक्षाचे सध्याचे स्वरूप नवीन विचारांसह तरुणांशी जुळवून घेऊ शकत नाही.
बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेशकाँग्रेसकडून 2019 मध्ये लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारा बॉक्सर विजेंदर सिंग याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विजेंदर सिंगला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. त्याआधीच त्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. बुधवारी विजेंदर सिंगने भाजपामध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विजेंदर सिंगने 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते.