आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी मणिपूर हिंसाचारावरुनकाँग्रेसवर आरोप केले. 'ईशान्येत काँग्रेसचे हात रक्ताने माखले आहेत आणि गेल्या ७५ वर्षांत त्यांच्या एकाही पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या जखमेवर मलम लावलेला नाही. काल संसदेत विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला. यावेळी काँग्रेसने भाजपवर आरोप केले. या आरोपांना सरमा यांनी प्रत्युत्तर दिले.
‘अविश्वास’वरून रंगले इंडिया Vs एनडीए युद्ध; राहुल गांधी बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांवर गुगली
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे ईशान्येत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. "काँग्रेसने आपल्या चुकीच्या धोरणांमुळे मणिपूर कसे जळत आहे, याचा विचार करायला हवा. त्याने ईशान्येत दुःखद परिस्थिती निर्माण केली.
मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरू आहे, यामध्ये सुमारे १६० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, 'संपूर्ण ईशान्येत काँग्रेसने दुःखद परिस्थिती निर्माण केली आहे. समुदायांमध्ये भांडणे एका रात्रीत सुरू झालेली नाहीत.' त्यांनी निदर्शनास आणले की मणिपूरमध्ये वांशिक-आधारित संघर्ष पहिल्यांदाच घडत नाहीत आणि 'पूर्वीच्या संघर्षात हजारो लोक मारले गेले होते.' हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, १९९० पासून हा संघर्ष सुरू आहे. मणिपूर हळूहळू सामान्य स्थितीत परत येत आहे आणि मे महिन्याच्या तुलनेत आता परिस्थिती चांगली आहे, असंही ते म्हणाले.
सरमा म्हणाले की, मणिपूर संघर्ष लष्कर आणि आसाम रायफल्सच्या मदतीने सोडवला जाऊ शकत नाही, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. 'मी काँग्रेसला आवाहन करतो की, जगाची दिशाभूल करू नका. ईशान्येत जे काही घडत आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. कोक्राझारमधील हिंसाचाराच्या वेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आसाम दौऱ्याबाबत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी संसदेत वस्तुस्थिती 'योग्यरित्या' सांगावी. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या अनेक महिन्यांपासून मौन बाळगल्यावर सरमा म्हणाले की, काहीवेळा मौन अधिक शक्तिशाली असते.'आम्ही गप्प बसलो कारण शब्दांनी मणिपूरमध्ये गदारोळ माजवला असता. गप्प बसल्याबद्दल मी केंद्र सरकारचा आभारी आहे, असंही सरमा म्हणाले.