काँग्रेसची मुसंडी तर भाजपाला धक्का? ५ राज्यांच्या ओपिनियन पोलमधून समोर आला असा कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:53 PM2023-11-04T20:53:52+5:302023-11-06T13:18:02+5:30
Assembly Election 2023: लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजली जात असलेली पाच राज्यांतील विधानसभांची निवडणूक या महिन्याच्या उत्तरार्धात होत आहे. तेलंगाणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजली जात असलेली पाच राज्यांतील विधानसभांची निवडणूक या महिन्याच्या उत्तरार्धात होत आहे. तेलंगाणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येणार आहे. दरम्यान, या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत एबीपी न्यूज-सी वोटरच्या सर्व्हेमधून धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
निवडणुकीपूर्वी अखेरच्या टप्प्यातील ओपिनियन पोलमधील कलांनुसार तेलंगाणामध्ये चंद्रशेखर राव यांचा बीआरएस, मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस, तर राजस्थानमध्ये भाजपा बाजी मारेल, असा दावा करण्यात आला आहे. पाच पैकी दोन राज्यांत काँग्रेस, तर एका राज्यात भाजपाला आघाडी मिळताना दिसत आहे. तर उर्वरित दोन राज्यांत प्रादेशिक पक्ष बाजी मारतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सर्व्हेनुसार तेलंगाणामधील ११९ जागांपैकी ४९ ते ६१ जागा बीआरएसच्या खात्यात जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ४३ ते ५५ भाजपाल ५ ते ११ आणि इतरांच्या खात्यात ६ ते ८ जागा जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये एमएनएफला १७ ते २१, झेडपीएमला १० ते १४, काँग्रेसला ६ ते १० आणि इतरांना ० ते २ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या ५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा बाजी मारताना दिसत आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४५ ते ५१, भाजपाला ३६ ते ४२ आणि इतरांना २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
या पाच राज्यांमधील सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. या ओपिनियन पोलनुसार २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये काँग्रेसला ११८ चे १३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला ९९ ते १११ जागांवर समाधान मानावे लागेल. इतरांच्या खात्यात ० ते २ जागा जाण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये मात्र काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. २०० जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपाला ११४ ते १२४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ६७ ते ७७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना ५ ते १३ जागा मिळू शकतात.