- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार असून गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत भारत जोडो यात्रा भाग-२ च्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, पक्षाध्यक्षांनी यात्रेबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधी यांच्यावर सोडला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, राहुल गांधी यांनी पूर्व-पश्चिम भारत जोडो यात्रा काढावी, अशी मागणी पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून करत आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव कार्यकारिणीसमोर ठेवला. खरगे यांच्या प्रस्तावाला कार्यकारिणीने मान्यता दिली असून, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
यात्रेचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे, असा असेल. ५० दिवसांच्या या प्रवासाची सांगता गुजरातमध्ये होईल. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ही पहिली भारत जोडो यात्रा पूर्णपणे पायी केली होती; पण यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व गुडघेदुखीमुळे ते संपूर्ण प्रवास पायी करणार नाहीत. कार, दुचाकी, सायकल व पायी, असे या यात्रेचे मिश्र स्वरूप असेल.