नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्ष आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकारे आणलेल्या अध्यादेशाचा आपकडून तीव्र विरोध केला जातोय. यात आपला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. आता या संघर्षात आपला काँग्रेसची साथ मिळाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
केसी वेणुगोपाल यांनी अध्यादेशाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विरोध करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने काँग्रेस पक्षाकडे पाठिंबा मागत होते.
पुढील आठवड्यात विरोधी पक्षांची दुसरी बैठक होणार आहे. पाठिंबा न मिळाल्यास आपने बैठकीला हजर न राहण्याचे जाहीर केले होते. पण, आता काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे बंगळुरुमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या दुसऱ्या बैठकीत आप सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या बैठकीत आम आदमी पक्षाच्या वतीने संजय सिंह आणि राघव चढ्ढा बिहारच्या बैठकीत सहभागी झाले होते. नंतर पक्षाने विरोधी व्यासपीठापासून स्वतःला दूर केले होते. पण, आता काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यामुळे आपही विरोधी पक्षांच्या पुढील बैठकांमध्ये सामील होणार आहे.