- बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला वापरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकात व नंतरही त्या राज्यात काँग्रेसमध्ये बंडाळी होऊ नये यासाठी चरणजितसिंह चन्नी यांना अडीच वर्षे व नवज्योतसिंग सिद्धू यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. अनुसूचित जाती, जाट शीख अशा सर्वांचीच मते मिळविण्यासाठी काँग्रेस ही राजकीय खेळी करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे उद्या, रविवारी लुधियाना येथे येणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते एक प्रचारसभा घेतील. त्यावेळी ते पंजाबमधील मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. चरणजितसिंग चन्नी किंवा नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापैकी कोणा एकाची जरी निवड केली तरीही त्यामुळे पक्षात असंतोष पसरणार आहे. त्यापेक्षा या दोघांनाही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यास संतुलन साधता येईल, असा विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठी करत आहेत. विधानसभा निवडणुकात काँग्रेस पक्ष पुन्हा विजयी झाला तर चन्नी व सिद्धू यांच्यापैकी मुख्यमंत्रिपदी प्रथम कोणाला निवडायचेे, याचा निर्णय काँग्रेस आमदारांवर सोपविण्यात येईल. पंजाबमध्ये चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर न केल्यास राज्यातील ३२ टक्के दलित नाराज होण्याची शक्यता आहे.