काँग्रेसची ‘वॉरंटी’ संपली, मग ‘गॅरंटी’ला अर्थ काय?; मोदींचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:07 PM2023-04-28T12:07:00+5:302023-04-28T12:07:39+5:30

पंतप्रधान मोदींची टीका; ‘डबल इंजिन’ सरकारचे फायदे लोकांना सांगण्याचे आवाहन

Congress's 'warranty' is over, then what is the meaning of 'guarantee'? | काँग्रेसची ‘वॉरंटी’ संपली, मग ‘गॅरंटी’ला अर्थ काय?; मोदींचा खोचक सवाल

काँग्रेसची ‘वॉरंटी’ संपली, मग ‘गॅरंटी’ला अर्थ काय?; मोदींचा खोचक सवाल

googlenewsNext

बंगळुरू : ज्या पक्षाची ‘वाॅरंटी’ संपली आहे, त्यांच्या ‘गॅरंटी’ला (निवडणूक आश्वासनांचा) काय अर्थ? असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना गुरुवारी मोदींनी त्यांना आगामी कर्नाटक निवडणुकीसाठी बूथस्तरीय प्रचाराला बळकटी देण्याचे आवाहन केले.

सत्तेत आल्यास जनतेला अनेक मोफत गोष्टी करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. या संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, ‘फुकट संस्कृती’मुळे राज्ये कर्जबाजारी झाली आहेत. देश आणि सरकार अशाप्रकारे चालविता येत नाही. कर्नाटकातील ‘डबल इंजिन’ सरकारचे फायदे आणि तोटे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच ‘मोफतच्या संस्कृती’विरुद्ध जनतेला सावध करण्याचे आवाहन केले. 

बेळगावच्या १८ जागांसाठी चुरस
बंगळुरूनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या विधानसभेच्या १८ जागा असलेल्या बेळगाव जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. परंतु, महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे (एमईएस) काही जागांवर दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो. 

अमित शाह यांच्याविरुद्ध तक्रार
‘काँग्रेसने निवडणूक जिंकली, तर कर्नाटक दंगलींनी ग्रस्त होईल,’ या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित विधानाबद्दल कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी गुरुवारी पोलिसांकडे तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

‘विषारी साप’वरून वाद
बेंगळूरू : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी कर्नाटकातील कलबुर्गी येथे प्रचारसभेत ‘पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्हाला वाटेल की ते विष आहे की नाही, पण जर तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल,’ असे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावर खरगे यांनी ‘भाजपची विचारसरणी विभाजनकारी, वैमनस्यपूर्ण आणि गरीब-दलितांविरुद्ध द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित आहे. आपण मोदींवर किंवा इतर कोणावरही व्यक्तिगत टीका केली नव्हती, असा खुलासा केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, खरगे यांच्या मनात विष आहे. ही विचारसरणी निराशेतून पुढे आली आहे कारण ते पंतप्रधानांशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस पराभवाच्या गर्तेत जात आहे, असे मत व्यक्त केले.

 

 

 

Web Title: Congress's 'warranty' is over, then what is the meaning of 'guarantee'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.