- रामचन्द्र गुहा(इतिहासकार आणि स्तंभलेखक)
कोणताही लेखक त्याच्या लिखाणापायी तयार झालेल्या त्याच्या शत्रूंमुळे ओळखला जातो. माझ्या दिल्लीतल्या मित्राने जेव्हा मला हे सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द आॅर्गनायझर’ मधल्या अग्रलेखात मला लक्ष्य करण्यात आले आहे, तेव्हा माझी उत्सुकता ताणली गेली. मी इंटरनेटवरून तो अग्रलेख शोधून काढला. त्यात असा आरोप करण्यात आला होता की, ‘रामचंद्र गुहा आणि रोमिला थापर हे दोघेही शिक्षणाच्या भारतीयिकरणाला भगवेकरण संबोधून त्याची टिंगल करीत आहेत. त्यांच्या या द्वेषमूलक मानसिकतेकडे दुर्लक्ष करीत आपण भारतीय तथ्यांवर आधारीत शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे’. हे वाचून मी अस्वस्थ झालो. भगवेकरण या संकल्पनेची अवहेलना करण्यात माझा कुठेही सहभाग नव्हता. संघ परिवाराच्या विचारांचा उल्लेख भगवा असा होणार नाही याची, खरे तर काळजी घेत असतो. दिवंगत यू.आर. अनंतमूर्ती यांच्या प्रमाणेच माझेही असे मत आहे की, भगवा या सुंदर रंगाचा संबंध शुद्धता आणि भारतीय इतिहासातील त्यागाशी आहे. त्यामुळे या रंगाचा संघाशी संबंध जोडण्याची माझी इच्छा नाही. आॅर्गनायझरचा हा अग्रलेख पुढे म्हणतो की, ‘शिक्षणाच्या भारतीयिकरणाचा आधार इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुळांमध्ये आहे आणि भारताला मानव विकास केंद्रात परावर्तीत करण्यासाठी हा एकच मार्ग आहे’. शिक्षणाचे भारतीयिकरण म्हणजे नेमके काय? शिवराम कारंथ एकदा म्हणाले होते की ‘भारतीय संस्कृतीवर बोलणे अशक्य आहे, कारण तो फार मोठा विषय आहे. आजची भारतीय संस्कृती इतक्या विविधतेने भरलेली आहे की त्या विविधतेलाही अनेक संस्कृत्या म्हणावे लागेल’. या संस्कृतीचे मूळ प्राचीन काळात जाते आणि ही संस्कृती अनेक वंश आणि लोकसमूहांशी संपर्क साधत विकसीत झाली आहे. म्हणूनच तिच्या अनेक घटकांकडे बघितले तर इथले कोण आणि बाहेरचे कोण तसेच या संस्कृतीने प्रेमाने काय मिळवले आणि बळजबरीने काय लादले हे सांगणे कठीण होऊन जाते. जगाच्या पाठीवरील प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या नजरेनेच पाहिले पाहिजे, असा संघाचा दृष्टीकोन आहे. आॅर्गनायझरच्या या अग्रलेखातही ‘अॅन्ग्लोसॅक्सन’ (प्राचीन इंग्रजी संस्कृती) मूल्यांवर हल्ला चढवून ही मूल्ये आपल्या संस्कृतीशी विसंगत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात कारंथ यांनी दिलेला इशारा विचारात घेण्यासारखा आहे. १९०८ साली प्रकाशित झालेल्या एका निबंधात रवीन्द्रनाथ टागोरांनी असे निरीक्षण नोंदवले होते की, ‘जर भारत पाश्चात्य जगापासून दूर राहिला असेल तर त्याने आता परिपूर्णतेसाठी पुढे आले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी तीन हजार वर्षापूर्वी जगाकडून जे घेण्यासारखे होते तेही बंद केले होते. वास्तवात जगाकडून घेण्यासारखेही खूप काही आहे’. टागोरांच्या नंतरच्या काळात जग खूपच जवळ आले आहे. भारताने आता युरोप, चीन, जपान, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेसोबत आणखी प्रभावी संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. आदानप्रदानातून आपण खूप काही चांगलं मिळवू शकतो व तेही आपल्याकडून काही प्राप्त करु शकतात. त्यासाठी ज्ञानाच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. भारतातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगाकडे बघण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, तसेच इथल्या मूल्यांकडे बघण्याचे मार्गदर्शन केले पाहिजे. आॅर्गनायझरच्या लेखाशी या बाबतीत मात्र मी सहमत आहे. पण इथल्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांबाबत माझी भूमिका जरा वेगळी आहे. शालेय अभ्यासक्रम स्थानिक वा प्रादेशिक परिस्थितीशी मिळतेजुळते ठेवणे हाच माझ्या मते शिक्षणाचे भारतीयिकरण करण्याचा रचनात्मक मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर जाऊन स्थानिक वन्यजीव, वनस्पती, जलस्त्रोत, कृषी, वने आदिंची माहिती घेतली पाहिजे व त्यांनी स्थानिक वास्तू वारसा, मंदीर, मशीद , चर्च, गुरुद्वारे आणि किल्ले यांचीही नोंद ठेवली पाहिजे. येथील विविधतेने नटलेल्या संस्कृती आणि निसर्गाविषयी जाणून घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांनी राजकीय चौकटीतून बाहेर येणे गरजेचे आहे. संघ पूर्वीपासून हेच सांगत आला आहे की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या कलानेच आधुनिक भारताचे नियोजन आणि निर्माण होत आले आहे. आता मात्र संघ कॉंग्रेसची आधुनिक भारताची संकल्पना बाजूला सारुन त्याला आदर्शवत असलेल्या वि.दा.सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या संकल्पनेतला भारत साकारण्याची संधी शोधत घातक पावले उचलीत आहे. काही विचारवंतांनी भारतीय संस्कृतीला एकसंध म्हणताना, त्यात हिंदुत्व शोधून काढले आहे व हीच बाब संघाच्या सोयीची आणि पथ्यकर ठरल्याने संघाचे काही अनुयायी देशात हिंदुत्व अमलात आणण्यासाठी उत्सुक झाले आहेत. सुदैवाने, भारतातील राजकीय विचारांचा प्रवाह भाजपा किंवा कॉंग्रेसच्या विचारांपेक्षा खूपच विशाल आणि विस्तृत आहे. अलीकडेच आयआयटी मद्रास मधील काही विद्यार्थ्यांच्या आंबेडकर-पेरियार अभ्यास मंडळावर घातलेल्या बंदी वरून एक वाद उफाळून आला होता. हे अभ्यास मंडळ आंबेडकर आणि पेरियार यांचे नाव घेत घेऊन काम करीत होते म्हणूनच त्यावर बंदी आली, हे उघड आहे. या दोन्ही विचारवंतांनी पाश्चात्य देशातली मूल्ये उचलून धरली होती आणि केवळ हिन्दुत्वाच्या आधारावर भारतीय संस्कृतीला संंकुचित करण्यास विरोध केला होता. विख्यात समाजशास्त्रज्ञ मेक्स वेबर यांच्या मताप्रमाणेच माझाही असा ठाम विश्वास आहे की ‘विद्यापीठे ही विद्यार्थ्यांवर मते लादणारी यंत्रणा होण्यापासून आणि एका विशिष्ट राजकीय किंवा धार्मिक विचारांची प्रचार-केंद्रे होण्यापासून रोखली गेली पाहिजेत’. हा बहुजनवाद कदाचित सांस्कृतिक वर्चस्ववाद्यांच्या किंवा कोणे एकेकाळी विद्यापीठातील शिक्षणावर प्रभाव पाडणाऱ्या डाव्यांच्या आणि आता त्यांची जागा घेऊ पाहणाऱ्या उजव्यांच्या विरोधातही असू शकेल.