नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकून सरकार स्थापण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडताना मतदारांनी बंगालची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या हाती तर दिलीच, पण तृणमूल काँग्रेसच्या २१५ उमेदवारांना विजयी करताना भाजपला १०० जागाही मिळू दिल्या नाहीत. हा पराभव भाजपच्या जिव्हारी झोंबणारा असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांनी आता ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. ममतांनी बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी त्यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला. त्यामुळे ‘गढ़ जीतलो; ग्राम हारलो’ अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त हाेत हाेती.
गेल्या महिन्यात देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यातून तामिळनाडू व पुदुच्चेरी वगळता कुठारही सत्ताबदल झालेला नाही. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या पराभव द्रमुक व काँग्रेस आघाडीने केला आहे. तिथे भाजपने अण्णा द्रमुकशी युती केली होती. द्रमुक व मित्रपक्षांना १४८ तर अण्णा द्रमुक व भाजप यांना मिळून ८३ जागांवर विजय मिळाला आहे. अत्यंत लोकप्रिय अभिनेते कमाल हासन हेही कोईम्बतूरमधून पराभूत झाले आहेत. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. माजी मुख्यमंत्री स्व. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन हे आता प्रथमच मुख्यमंत्री बनतील
पुदुच्चेरीमध्ये मात्र एआयएनआरसी या मित्र पक्षाच्या साह्याने भाजपला सरकारमध्ये जाता येईल. तेथील एकूण ३० पैकी १३ जागा भाजप व मित्रपक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तिथे अपक्षांची मदत घ्यावी लागेल. तेथील काँग्रेसचे सरकार दोन महिन्यांपूर्वी बहुमताअभावी कोसळले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री नारायण सामी यांना तर काँग्रेसने यंदा उमेदवारीही दिली नव्हती. गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या आसाममध्ये मात्र भाजपच पुन्हा सरकार स्थापन करेल. तेथील १२७ पैकी ७६ जागा भाजप व मित्र पक्षांनी जिंकल्या आहेत. तिथे आपण सत्तेत येऊ, असे काँग्रेसला वाटत होते. त्यासाठी स्थानिक पक्षांनाही सोबत घेतले होते. पण मतदारांनी काँग्रेस व मित्रपक्षांचे ४८ उमेदवारच विधानसभेत पाठविले आहेत.
रात्री उशिरापर्यंत नंदीग्रामचे नाट्य नंदीग्राममध्ये सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांचा १२००ने विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले हाेते. मात्र, काही वेळाने भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी हे विजयी झाल्याची घाेषणा करण्यात आली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने ट्विट करून मतमाेजणी अद्याप सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर अधिकारी यांचा १९५६ मतांनी विजय झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. हा प्रकार म्हणजे भाजपचा रडीचा डाव असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.