४०० पेक्षा जास्त जागांवर इंडिया आघाडीचे एकमत! बालेकिल्ल्यातील जागा मित्रपक्षांना देण्यास कॉंग्रेसची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:32 AM2024-01-15T06:32:29+5:302024-01-15T06:33:02+5:30
काँग्रेसने लोकसभेच्या जागांची संख्या ३५० वरून २६० पर्यंत कमी केल्याने इतर सहकारी पक्षांना सकारात्मक संदेश गेला आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : २८ पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीत ५४३ जागांपैकी ४०० हून अधिक लोकसभेच्या जागांवर सहमती होण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसने लोकसभेच्या जागांची संख्या ३५० वरून २६० पर्यंत कमी केल्याने इतर सहकारी पक्षांना सकारात्मक संदेश गेला आहे.
भाजपला थेट लढत देता येईल, त्यासाठी काही जागा मित्रपक्षांना देण्याबाबत काॅंग्रेस आणखी तडजोड करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांना त्यांच्या अस्तित्वाचे आव्हान असणार आहे. ३०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागांचा जनादेश घेऊन पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा परतले, तर काय याबाबत या नेत्यांना भवितव्याची पूर्ण जाणीव आहे.
कोणत्या राज्यात काय परिस्थिती?
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, त्रिपुरा आणि इतर राज्यांसह बालेकिल्ल्यात भाजपला पराभूत करण्यात मदत झाल्यास इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांना खुल्या मनाने जागा देण्यास काँग्रेस तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आंध्र प्रदेश (२५ जागा) आणि ओडिशा (२१) यांसारख्या राज्यांत इंडिया आघाडीचे वर्चस्व नाही. काँग्रेस आंध्रमध्ये टीडीपी आणि ओडिशामध्ये टीएमसी आणि जेडी (यू) आणि इतर पक्षांशी आघाडी करण्याचा विचार करत आहे.
तेलंगणा (१७) आणि कर्नाटक (२८) सारखी राज्ये आहेत, जिथे कोणत्याही विरोधी पक्षाचा जागांवर दावा नाही. बिहार, झारखंड, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये ही आघाडी आधीच अस्तित्वात आहे.
उत्तर प्रदेश (८०), पश्चिम बंगाल (४२) आणि काही ईशान्येकडील राज्यांमध्ये समस्या आहेत. यास वेळ लागेल; पण येत्या आठवडाभरात यावर उपाय सापडेल, असेही नेत्यांनी सांगितले.
भाजपला थेट लढत
आम्ही लोकसभेच्या ४५० जागांचे लक्ष्य ठेवत आहोत. प्रत्येक राज्यात अशा जागा आहेत, जिथे काही मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात; पण ‘इंडिया’ भाजपला ४०० पेक्षा जास्त जागांवर लढत देईल, असे एका कॉंग्रेस नेत्याने सांगितले.