नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानच्या सुरक्षा महासंचालकांच्या गुरुवारी सुरू झालेल्या बैठकीचा प्रारंभ सकारात्मक झाला आहे. दोन्ही देश सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमत झाल्यामुळे आणखी दोन दिवस चालणारी ही बैठक ठोस निष्पत्तीसह संपेल अशी आशा निर्माण झाली आहे.दोन देशांदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) दर्जाची बैठक रद्द झाली असतानाच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांमुळे आणि दोन्ही देशांच्या नेतृत्वाने युद्धाची भाषा केल्यामुळे तणावात भरच पडली होती.या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात सुरू झालेल्या या बैठकीत भारतातर्फे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि सीमेपलीकडील घुसखोरी या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला जात आहे. या तीन दिवसीय चर्चेसाठी पाकिस्तानचे १६ सदस्यीय प्रतिनिधीमंडळ सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणारे पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुख बुर्की यांना बीएसएफ मुख्यालयात गार्ड आॅफ आॅनर देण्यात आला.(लोकमत न्यूज नेटवर्क)