कोलकाता : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) अलिकडच्या काळातील इतिहासात एक अभूतपूर्व घटना . माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पक्षाच्या राजकीय स्थिती व भवितव्याविषयी सादर केलेला प्रस्तावाचा मसुदा पक्षाच्या मध्यवर्ती समितीने फेटाळून लावला. समितीच्या तीन दिवसीय बैठकीत हा निर्णय झाला.केंद्रीय समितीने येचुरी यांचा अहवाल ५५ विरुद्ध ३१ मतांनी फेटाळून लावण्यात आला. त्याला पर्याय म्हणून माकपचे माजी सरचिटणीस प्रकाश करात व एस. रामचंद्रन यांनी पक्षाच्या राजकीय स्थितीविषयी तयार केलेला अहवाल मध्यवर्ती समितीने स्वीकारला. दर तीन वर्षांनी माकपचे राष्ट्रीय अधिवेशन भरते. ते येत्या एप्रिलमध्ये हैदराबाद येथे होणार असून त्यात करात व एस. रामचंद्रन यांच्या अहवालावर आता मंथन होईल. या घटनेमुळे माकपमधील सीताराम येचुरी व प्रकाश करात या दोन गटांमधील मतभेद आणखी तीव्र होणार आहेत. २०१९मधील लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेस पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी याबाबत करात व येचुरी यांची मते भिन्न आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायला हवा यावर करात व येचुरी यांचे एकमत असले तरी त्यासाठी वापरायच्या मार्गांबाबत दोघांतही एकवाक्यता नाही. सीताराम येचुरी यांनी मध्यवर्ती समितीमध्ये सादर केलेल्या अहवालात म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे ही गोष्ट महत्वाची असली तरी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही सत्ताकांक्षी पक्षाबरोबर युती करु नये. हे मत व्यक्त करताना येचुरी यांनी काँग्रेसचे नाव घेण्याचे टाळलेले आहे. पण त्याचबरोबर समझोता हा शब्द वापरणे टाळले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा-प्रकाश करात यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी माकपने काँग्रेसशी निवडणूक समझोता किंवा युती न करता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा.
येचुरींचा मसुदा फेटाळल्याने ‘माकप’मधील मतभेद तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:01 AM