दिलासा : युक्रेनच्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिपची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 06:17 AM2022-03-06T06:17:29+5:302022-03-06T06:17:38+5:30
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष इंर्टनशिप करता येणार आहे.
- सुरेश भुसारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या, परंतु इंटर्नशिप पूर्ण करू न शकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप करू देण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) घेतला आहे.
युक्रेनमध्ये जवळपास २० हजारांवर भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष त्याच महाविद्यालयात इंटर्नशिप करावी लागते; परंतु युक्रेनमध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप पूर्ण करता
आली नाही त्यांचे वैद्यकीय वर्ष वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष इंर्टनशिप करता येणार आहे.
यासंदर्भात राज्यांच्या वैद्यकीय परिषदांना सूचना दिल्या आहेत. यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाची इंटर्नशिपची क्षमता साडेसात टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
स्टायपेंडही मिळणार : या काळात या विद्यार्थ्यांना भारतात लागू असलेली स्टायपंडची रक्कम व इतर सुविधासुद्धा मिळणार असल्याचे एनएमसीने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात राज्य वैद्यकीय परिषदांनी इंटर्नशिप देण्यासाठी तात्पुरत्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जारी केल्या आहेत.