मणिपूर हिंसेच्या मागे षडयंत्र; CM योगींनी 'त्या' व्हिडिओच्या टायमिंगवरही उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:14 PM2023-07-31T20:14:36+5:302023-07-31T20:15:42+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मणिपूर हिंसाचारामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
Manipur Violence: मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावरुन विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. महिलांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारविरोधात संतापाची लाट आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्या महिलांच्या व्हिडिओवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले.
पॉडकास्टमध्ये यूपीच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बनवत आहेत. मणिपूरमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार झाला आणि त्यानंतर महिलांवर सामूहिक बलात्कार झाला, या मुद्द्यावरून विरोधक भाजप सरकारवर टीका करत आहेत.
#WATCH | UP CM Yogi Adityanath speaks on Manipur issue, "Peace will be restored in Manipur and development works will be taken forward by the BJP government in the state.” pic.twitter.com/GlEIBOPVYp
— ANI (@ANI) July 31, 2023
काय म्हणाले योगी?
यावर सीएम योगी म्हणाले की, गेल्या 9 वर्षांत ईशान्येकडील राज्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम सरकारने केले आहे. मात्र या काळात शेजारील देशांनी कटकारस्थान केले, त्याचे पुरावेही मिळाले आहेत. जेव्हा एखादी यंत्रणा विनाकारण हस्तक्षेप करते, तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, याची मला खात्री द्यायची आहे. प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षा प्रदान करणे, हे कोणत्याही सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. आमचे सरकारही या दिशेने काम करत आहे.
व्हिडिओच्या वेळेवर उपस्थित केला प्रश्न
मुख्यमंत्री योगी यांनी मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर दोन महिने सुरक्षित ठेवला आणि ज्या दिवशी अधिवेशन आहे, तेव्हाच व्हायरल का केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, शांतता बिघडवण्याचा आणि देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकशाही चिरडणाऱ्या लोकांचे हे षडयंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.