भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला आणि पुरुष कुस्तीपटूंनी गंभीर आरोप करत आघाडी उघडली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. एकीकडे अनेक दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आवाज उठवत असताना काही कुस्तीपटू मात्र त्यांच्या समर्थनार्थ समोर येत आहेत. आता ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता कुस्तीपटू नरसिंग यादव यानेही ब्रिजभूषण सिंह यांना समर्थन दिले आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना नरसिंह यादव म्हणाला की, हा मोठा कट आहे. एकेकाळी जसा माझ्याविरोधात कट रचला गेला. तसेच कटकारस्थान ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात रचले जात आहे. ब्रिजभूषण सिंह हे कुस्ती महासंघामध्ये आल्यानंतर नियमांमध्ये सुधारणा झाली आहे. आता प्रत्येक राज्यातील खेळाडूंना संधी मिळत आहे.
नरसिंह यादव पुढे म्हणाला की, हरयाणाच्या प्रत्येक ट्रेनिंग कॅम्पमध्ये पक्षपातीपणा चालतो. कुठे होत नाही. ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरोधात होते. सर्वांना संधी द्यायचे. त्यामुळे हे सारे होत आहे. त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत खेळणं सर्वांचा हक्क आहे. सर्व राज्यातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे हक्कदार आहेत. ब्रिजभूषण सिंह आल्यानंतर सर्व गोष्टी बदलल्या आहेत. हरियाणाशिवाय इतर राज्यातील खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्याशिवाय देशामध्ये चांगला खेळाडू कोण आहे, हे कसे कळणार?, असा सवाल नरसिंह यादवने उपस्थित केला आहे.
कुस्तीमध्ये सर्वांना संधी मिळाली पाहिजे. संपूर्ण देशातील खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. कुठल्याही खेळात ज्या राज्यातील खेळाडू अधिक असतील किंवा आधीपासून खेळत असतील, त्यांची मनमानी चालेल. असे होता कामा नये. जे आरोप लावले जात आहेत, ते अगदीच चुकीचे आहेत. कुठलाही तपास करा. हे राजकारण होत आहे, असा आरोपही नरसिंह यादवने केला.