नवी दिल्लीनव्या कृषी कायद्यांना विरोध होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देशातील शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. एकूण ८ पानांच्या या पत्रात नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना 'एमएसपी'च्या मुद्द्यावर लेखी आश्वासन देण्याची सरकारची तयारी असल्याचंही म्हटलं आहे.
"कृषी कायद्यांवरुन काही जण राजकारण करत असून समाजात खोटी माहिती पसरवण्याचं काम करत आहेत", असं तोमर म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या मार्गाने कोणताही भेदभाव न करता सर्वांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ६ वर्षांचा इतिहास याचा साक्षीदार आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
"कृषी कायद्यांमध्ये केल्या गेलेल्या बदलांमुळे देशाच्या शेती व्यवस्थेचा नवा पाया रचला जाईल. देशातील शेतकऱ्यांना स्वतंत्र करतील, मजबूत करतील. शेतकऱ्यांच्या मोजक्या गटांनी गैरसमज आणि चुकीच्या सूचना पसरवण्याचं काम केलं आहे. ते गैरसमज दूर करणं माझं काम आहे", असं तोमर म्हणाले.
रेल्वे रुळांवर आंदोलन केल्यामुळे रेल्वेसेवा ठप्पा झाली आहे. त्यामुळे देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांपर्यंत धान्य पुरवठा होणं बंद झालं आहे. असं करणारे हे शेतकरी असू शकत नाहीत, असंही ते पुढे म्हणाले. कृषी कायद्यांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसोबत संपर्कात असून अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांनी कायद्याला पाठिंबा दिल्याचा दावा तोमर यांनी केला आहे.
नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचीही अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. मी स्वत: शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे शेतीतील सर्व आव्हानं, बारकावे मला चांगले समजतात. शेतीतील आव्हानांना सामोरं जातच मी मोठा झालो आहे, असंही तोमर यांनी पत्रात म्हटलं आहे.