नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीला संपविण्यासाठी पक्षातील सर्व बड्या नेत्यांना तुरुंगात टाकणे, बँक खाती गोठवणे आणि पक्षाचे कार्यालय रिकामे करण्याची भाजपने ‘ऑपरेशन ब्रूम’अंतर्गत तिहेरी योजना आखली असल्याचा आरोप रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
स्वाती मालीवालप्रकरणी स्वीय सहायक बिभवकुमारला अटक केल्याच्या प्रत्युत्तरात रविवारी दुपारी केजरीवाल यांच्या नेतृत्वात आपच्या मंत्री, आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयापासून काही अंतरावर निदर्शने केली. ‘आप’च्या सर्व नेत्यांना मोदी सरकारच्या पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकावे, असे आव्हान देत अर्धा तास भाजप मुख्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. नेत्यांना तुरुंगात टाकून ‘आप’ला चिरडून टाकता येईल, हा भाजपचा गैरसमज आहे. त्यांनी तो करूनच पाहावा. आम्ही सर्व नेते भाजप मुख्यालयासमोर जमतो, तुम्ही आम्हाला अटक करा, असा पवित्रा घेत केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शने केली.
मुख्यमंत्र्यांच्या घरातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त- आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ल्याच्या चौकशीसंदर्भात दिल्ली पोलिसांचे एक पथक रविवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले.
- हल्ल्याचे फुटेज मिळविण्यासाठी पोलिस पथकाने सीसीटीव्ही डीव्हीआरसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे.
‘आप’ने केला दिल्ली पोलिसांवर आरोप दिल्लीत येत्या शनिवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी आपला बदनाम करण्यासाठी मालीवालप्रकरणी केंद्र सरकार आणि भाजपच्या मोहिमेत दिल्ली पोलिस सक्रिय भूमिका बजावत असल्याचा आरोप दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला.
मुख्यमंत्री निवासस्थानातून दिल्ली पोलिस सीसीटीव्ही फुटेजचा संपूर्ण तपशील घेऊन गेले. हे फुटेज गायब असल्याचा खोटा दावा करीत असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला.
मालीवाल यांची टीका -एकेकाळी निर्भयासाठी न्याय मागणारी आम आदमी पार्टी आज आपल्याला मारहाण करणाऱ्या आरोपीची साथ देत असल्याची टीका करणारे ट्वीट राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी केले.
‘केजरीवाल गप्प का?’ -भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केजरीवाल यांना न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात धाडण्यात आले आहे. ते मालीवालप्रकरणी गप्प का?, असा सवाल दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला.
‘बिभवकुमारने फोन फॉरमॅट केला’ -पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपी बिभवकुमारने त्याचा मोबाइल फोन फॉरमॅट केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.