उत्तर प्रदेशमधील संभल येथील जामा मशिदीच्या सर्व्हेवरून झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. संभल हिंसाचारामधील मास्टर माईंड आणि कुख्यात ऑटो लिफ्टर शारिक साटा याचा खासमखास गुंड असलेल्या गुलाम याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी गुलाम याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहिद साटा याने त्याच्याकडे ज्ञानवापीपासून संभलपर्यंत संवेदनशील खटले लढणारे सुप्रीम कोर्टामधील वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती, असे कबूल केले आहे.
याबाबत संभल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गुलाम याच्याविरोधात २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता त्याला करण्यात आलेली अटक हे पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. संभलमधील जामा मशिदीच्या सर्व्हेवरून हिंसा भडकली होती. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते. तसेच वातावरणही तणावपूर्ण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत होती. त्यातच आता गुलाम याच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संभलचे एसपी के. के. विश्नोई यांनी सांगितले की, गुलाम याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणात आणखीही महत्त्वाची माहिती समोर आणू शकते.